मी
(अद्याप) गे नाही. आणि त्यामुळे मला असं वाटतं की मला सम-लैंगिकता म्हणजे काय हे
(अद्याप) कळू शकत नाही. मला असं हायपोथिसतं की कोणत्याही समूहात बरेचसे च्युते,
त्याहून थोडे कमी धूर्त आणि थोडे शहाणे असं डिस्ट्रिब्युशन असतं. मला उगाच सगळ्यांबद्दल आदर नाही, किंवा
सर्वांभूती एक असं काही पण मला वाटत नाही. पण ज्याला त्याला आपल्या मनाप्रमाणे च्युत्याप
करू द्यावा अशी आपली प्रामाणिक भूमिका आहे. कोणी एक उठून असं करा बघू सगळ्यांनी
असं म्हटलं की नेमकं ते न करण्याची आपली बालपणापासून आवड राहिली आहे. हे चाललंय
हेही त्याला धरूनच आहे!
आता
न्यायालयाने सांगितलं आहे की गे सेक्स हा बेकायदेशीर आहे. वर म्हटल्याप्रमाणे ह्या
कायद्याची अद्याप तरी भीती नाही. पण सोबत जे काही लिखाण पेपरात किंवा जिथे जमेल
तिथे उगवू लागलं आहे तिथे सोबत अजूनही काही रुचकर आणि इशाराजनक गोष्टी येत आहेत.
म्हणजे मुख मैथुन (ओरल सेक्स) आणि हस्तमैथुन हेही बेकायदेशीर आहे असं मी एकीकडे
वाचलं आहे. आता आपण माझे कामजीवनाचे प्रयोग असं प्रांजळ आत्मकथन करण्याइतपत मोठे
नसल्याने आपण आपल्या मूठभर (साधी मूठ हो!!) लिखाणात तेवढे आपली घबराट सांगू शकतो. आणि
घबराटसोबत प्रश्न तर पडतातच आपल्याला.
१.
गे सेक्स बेकायदेशीर
आहे, पण नवरा-बायकोने गुदमैथुन केलं तर?
२.
गे सेक्स बेकायदेशीर आह,
मग लेस्बिअन सेक्सचं काय? का त्यात पेनिट्रेशन नावाचा प्रकार, खेळणी(!) वगैरे
वगळता (तीही बेकायदेशीर बरं!) शक्य नसल्याने तिथे कायदा काही बोलत नाही?
३.
सेक्स हा
प्रजोत्पादनासाठी आहे असंच जर नैसर्गिक आहे तर मग जिथे जिथे सेक्स हा
प्रजोत्पादानाशिवाय बाकी कारणाने वापरला जातो ते सारं बेकायदेशीर का नाही? म्हणजे
सिनेमे, पुस्तकं, सिरियल्स, जाहिराती, स्त्री-पुरुषांनी एकमेकांशी बोलणं ह्या
साऱ्यातच सेक्स आहे की. (एक लडका और लडकी कभी दोस्त नही हो सकते, कोरोलरी: कोणतेही
दोन स्त्री पुरुष मित्र-मैत्रीण म्हणजे सेक्शुअल कपल इन मेकिंग!) मग काय काय
बेकायदेशीर करणार? का झाला सेक्स तरच गुन्हा, गुन्ह्याची तयारी हा गुन्हा नाही,
परफेक्ट!!
४.
आपली ‘संस्कृती’ काय
म्हणते गे सेक्स बद्दल, किंवा समलैंगिक संबंधांबाबत? महाभारतात बृहन्नडा आहे, पण
तिच्या/त्याच्या लैंगिक जीवनाबद्दल काही नाही. अर्धनारीनटेश्वर आहे, पण बाकी तपशील
नाही.
५.
सरकार आणि न्यायव्यवस्था
ह्यांनी सेक्सबद्दल भूमिका घ्यावी का? म्हणजे मी त्यांची कुटुंब कोणाचं असावं
ह्याबद्दलची भूमिका समजू शकतो. पण सेक्सबाबत भूमिका घ्यायची गरज का आहे?
संस्कृतीवाल्यांना हे प्रश्न विचारून तसा
फायदा नाही. मुळात प्रश्न विचारणं हे संस्कृतीत बसतं का, का फक्त तल्लीन होऊन मान
डोलावणं हे आधी कन्फर्म करायला हवं. पण सरकार आणि न्याय व्यवस्था ह्यांनी सेक्स
ह्या व्यक्तिगत क्रियेच्या बाबतीत काय भूमिका घ्यावी ह्यावर आपली संस्कृती काय
म्हणते? समजा उद्या, म्हणजे सहा महिन्यातच म्हणा, सनातन धर्माचे मसीहा भारतात
अवतरल्यानंतर केवळ कामसूत्रात आहेत तेवढ्याच पोझिशन्स कायदेशीर असं लागू झालं तर? आणि
मग अशा पोझिशन्स शिबिरं वगैरे घेऊन शिकवणार काय?
आणि
असे आलेच सगळे कायदे, तरी त्याचं पालन होतंय का नाही हे पाहणार कोण? का जेव्हा
त्याचं उल्लंघन सापडेल तेव्हाच शिक्षा? म्हणजे हे घर घेताना द्यावं लागणाऱ्या काही
टक्के भागासारखं आहे.
फेसबुकवर
एका चर्चेत एकाने हाच मुद्दा मांडला. की कायदा काहीही असो शाट, कळीची बाब आहे ती
काहीही करा, पण पकडले जाऊ नका. कायदा लागू होईल जेव्हा पकडले जाल. मग सर्वोच्च
न्यायालय काहीही का ठरवेना. सर्वोच्च न्यायालय तसं तर रेती उपसायलाही नाही
म्हणालाय, पण म्हणून रेती थांबणार थोडीच आहे!! पण रेतीचे ट्रक भल्या पहाटे दिसतात
तरी. उद्या नैतिक पोलीस असे रात्री-अपरात्री किंवा कधीही म्हणा, कोणाच्या बेडरूमचा
कानोसा आणि डोळोसा घेताना आढळले आणि त्याचं कारण त्यांनी ३७७ कलम आणि त्यासदृश्य
दिलं तर?
अर्थात
समजा न्यायालयाने ह्याच्या उलट काही निकाल दिला असता तरीही प्रश्न असतेच. म्हणजे
सम-लैंगिक संबंध नैसर्गिक आहेत असं मानलं तर इनसेस्ट आणि पिडोफाईल ह्या
प्रकारांबद्दल काय? किंवा मनुष्य आणि प्राणी अशा संबंधांबाबत? मी इथे स्पष्ट करू
इच्छितो की मला ह्यातल्या कुठल्याही प्रकाराबाबत विशेष कळवळा नाही. पण ज्यांना
आहे, अगदी मुलांचे लैगिक शोषण करणारेही, तेही एक प्रकारे स्वतःच्या कामेच्छेला
जस्टीफाय करू शकतातातच, की आम्ही असेच आहोत म्हणून! मग? (परत फेसबुकवर) एका
धार्मिक व्यक्तीने ह्या निकालाचं समर्थन आणि निकालाने दुखावलेल्यांवर टीका करताना
म्हटलं होतं की आज सम-लैंगिकता कायदेशीर करा म्हणता आहात, उद्या बालकांचे लैंगिक
शोषण आणि इनसेस्ट मागाल!! स्वातंत्र्याची नेमकी रेषा आखायची कोणी?
पिडोफाईल प्रकाराबाबत भूमिका घेणं सोपं आहे,
कारण त्यात एक व्यक्ती ही पूर्णपणे व्यक्ती नाहीच आहे. आणि त्यामुळे अशी क्रिया ही
दोन्ही व्यक्ती सारासार विचार करून करू शकत नाहीत असं ठरवून तिला गुन्हा ठरवता
येतं. पण सारासार विचार करायची क्षमता असलेल्या दोन व्यक्तीमध्ये घडणाऱ्या लैंगिक
क्रियेबद्दल, जी पूर्णतः व्यक्तिगत स्पेसमध्ये आहे तिथे?
कोर्टाच्या ह्या
निकालाचा बेस काय आहे? ब्रिटीश जमान्याचा कायदा का मानवी जीवनाची
नैसर्गिक-अनैसर्गिक अशी विभागणी? जर पूर्वीचा कायदा असं असेल तर मॅकॉलेच्या नावाने
बोटे मोडून मोडून थकली अशांनी ह्या कायद्याला टाळ्या वाजवणे हे भारीच काम आहे! का
आता ते बालादपी सुभाषितं ग्राह्यं...असा परत एक संस्कृतीचा धडा देणार आहेत!! पण
समजा नैसर्गिक-अनैसर्गिक अशी काही एक विभागणी असेल तर मात्र बरीच गहिरी बात आहे. राजीव
सान्यांनी थोडे धडे घेतलेच आहेत म्हणा ह्यावर. पण असं विचारतो मी आता की..
१.
लोकशाही नैसर्गिक आहे
का? का एकनायकी कळप?
२.
विवाहसंस्था नैसर्गिक
आहे का?
३.
नैसर्गिक ठरवायचा निकष काय
आहे? का जे बहुतांश लोक करतात, मानतात ते नैसर्गिक? मग जातीव्यवस्था, अगदी आज
मानली जाते तशी, ती पूर्वीची थोर श्रम विभागणीवाली नव्हे, ती पण नैसर्गिक का?
४.
माणसाने विचार करून
आपल्या भवतालात बदल करणं हे नैसर्गिक का अनैसर्गिक?
५.
मंगळावर यान पाठवणे?
६.
इंटरनेट नैसर्गिक आहे
का?
७.
फिक्शन रायटिंग नैसर्गिक
आहे का?
८.
सत्याग्रह आणि व्यवस्थेत
बदल सुचवणं नैसर्गिक आहे का?
९.
का हवं तेव्हा नैसर्गिक
आणि बाकी वेळ सोय हे नैसर्गिक?
हे प्रश्न म्हणजे लिबरल
भूमिकेची सत्वपरीक्षा(J)आहे. आणि त्यात गंमत म्हणजे असं दिसतं आहे की एक वाढता कळप आहे ज्याला
एकूणच लिबरल भूमिकाच मान्य नाही. लिबरल म्हणजे पाश्चिमात्य आणि हा कळप जे म्हणतो
तेच तेवढं इथलं, तेच तेवढं बरोबर, तेच तेवढं नैसर्गिक, तेच तेवढं शाश्वत. बाकी
सपशेल च्युत्ये. प्रश्न विचारणारे तर एक नंबर च्युत्ये. केवळ संस्कृत दाखले देत
बोलणारे तेवढे चिंतक, बाकी चिंताजनक. संस्कृतीचा टाहो फोडणारे ते दार्शनिक आणि
बाकीचे फार्स. असेल बाबा, असंच असेल. आपली मती तर एवढी नाहीच. आपण फार प्युअर
लिबरल पण नाही. झालंच तर स्युडो-च्युत्याप-लिबरल अशी आपली भूमिका आहे. आणि त्यात फॉल्सिफिकेशन
होऊन आपण एक हास्यास्पद फॉसिल्स बनणार ही नियतीची शिकार तर आहेच. वाईच गंमत करतो
आपण झालं...