आज लोकल ट्रेन प्रवासात मी
ऐकलेली चर्चा:
- त्या पिंगा गाण्याचं वाचलं
का?
- हो ना, एवढा अजिंक्य
योद्धा, आणि ह्यांना त्याची मस्तानी तेवढी दिसते. अरे त्याचे धडे आहेत - इंग्लंड-
अमेरिकेत असे वागा म्हणून. आपल्याकडे नाहीत.
- हो ना. आता असं असताना समजा
त्याचं झालं एखादं अफेअर तर काय आहे?
- त्या वेळेला पद्धत होती.
बायका पण असत २-३.
- शिवाजी महाराजांच्या पण ५
बायका होत्या.
- पण ते लोकांना एकत्र
आणण्यासाठी होतं.
- गांधी- नेहरू , त्यांची
नव्हती का लफडी? अरे, आपल्या एवढ्या खोट्या नोटा का बनतात? कारण गांधी छापणं सोपं
आहे नोटेवर. ना केस, ना कपडे. एक चष्मा काढला कि झालं.
- आपण बाजीरावसारखे लोक सोडून
गांधी-नेहरू करत बसलो.
- आणि नेहरूमुळे काश्मीरचा
प्रश्न आला.
- एकदाच मिल्ट्री पाठवा आणि
पाकव्याप्त काश्मीर घेऊन टाका.
(हे सर्व ऐकणारा एक
सहप्रवासी) तुम्ही डोंबिवलीला बसून येऊन कल्याणच्या लोकांच्या सिट घेता आणि वर
त्या दादरपर्यंत सोडत नाही. पाकिस्तान काय काश्मीर सोडणार आहे?
मग हशा.. मग दारू, पार्टी,
कोणी काय खायला आणलंय, पे कमिशन असं करत गाडी चाल्ली.
---
वरील चर्चा प्रातिनिधिक आहे का अपवादात्मक ही खरी कुतूहलाची बाब
आहे. वरील चर्चा करणाऱ्या लोकांची जनरल माहिती म्हणजे: सरकारी नोकरी आणि खाजगी
क्षेत्रातील नोकरीतील मध्यम पदांवरचे, ५०+ वयाचे, पेशव्यांच्या अपमानाने व्यथित
होणाऱ्या प्रकारचे आणि तश्या शहरांतले.
--
‘पिंगा’ गाण्यावर माझं मत – न आवडलेलं. एकदाही पूर्ण पाहू शकलो नाही.
त्याच्या ऐतिहासिक
संगतीबद्दल – अप्रस्तुत प्रश्न. मी मुळात ऐतिहासिक कादंबऱ्या आणि सिनेमे-नाटके
ह्यांना फिक्शन म्हणूनच बघतो. त्यामुळे त्यांच्यात इतिहासाची, त्यात व्यक्तिगत प्रसंगांच्या शक्य-शक्यतेची संगती शोधणे म्हणजे
चिऊ-काऊच्या गोष्टीला जीवशास्त्रीय प्रश्न विचारण्यासारखे आहे.
इतिहास म्हणून
सांगितल्या जाणाऱ्या कथा, दंतकथा, मिथके एकत्र मळून घ्यायची. त्यात ऐतिहासिक
सत्याचं दिसेल न दिसेल असं मीठ घालायचा. त्यात सिक्सपॅक्स माचो आणि छुपा योग्य जागा कुरवाळणारा कंटेंपररी मसाला घालायचा. मग
हिरो+हिरोईन+व्हिलन ह्या तेलात नीट परतून घ्यायची. आणि पी.आर. एजन्सीला फोडणी
द्यायची. हे माझे 'ऐतिहासिक व्यक्ती-प्रसंग ह्याबद्दलचे सिनेमे कसे बनतात' ह्याचे मॉडेल आहे.
एवढं बोललो मी ह्या विषयावर, माती खाल्ली.
खाल्लीच आहे तर उबळ पूर्ण करण्यासाठी
म्हणून पेशव्यांच्या वारसदाराच्या मते योग्य असलेल्या पेशवाईच्या चित्रीकरणातले हे एक ऐतिहासिक तथ्य. नक्कीच
ह्याचे पुरावे पुण्यातल्या कुठल्यातरी वाड्यात पुरले गेलेले असणार. त्याच
सिनेमातले अटकेपार जाणारे हे दुसरे तथ्य.
दुसरी एक ज्वलंत थिअरी पण आहे माझ्या डोक्यात:
भन्साळीला पैसा दिला
दाउदने. कल्पना दिली केजरीवाल आणि अन्य धर्माच्या एका धर्मगुरूने. त्यामुळे
भन्साळीने ही धर्म+संस्कृती+संस्कार+इतिहास भ्रष्ट करणारी निर्मिती केलेली आहे. हे
वामपंथी सिक्युलर षडयंत्र आहे. मुळात एक अजिंक्य योद्धा एका यवन नर्तिकेच्या
प्रेमात वगैरे पडेल हेच झूठ आहे. कणसे खाऊन लढणाऱ्या आणि दिल्लीचे तख्त फोडणाऱ्या
वीराच्या अबलख वारूची लाथ केव्हातरी ह्या यवन नर्तीकेला बसली असावी. पण तेवढा
बादरायण संबंध पकडून यावनी आणि तद्नंतर पाश्चिमात्य विकृतीकारांनी एक धादांत असत्य
इतिहास म्हणून घुसडून दिले. कारण त्यांना भारतीयांना तुमच्याकडे कोणतीच रोल-मॉडेल
नाहीत असे दाखवून त्यांचे खच्चीकरण करायचे होते. (हे शेवटचे विधान आपोआप सिद्ध
होणारे सनातन सत्य आहे.)
पह्लानी त्यांच्या
महापुरुष अतिसत्य प्रसारणाच्या कामात व्यग्र असताना भन्साळीने ही फिल्म पुढे नेली.
अन्यथा सांस्कृतिक गाळण्यातून असला गाळ बाहेर येणेच अशक्य आहे.
--
मागे बघत बघत पुढे जाऊ पाहण्याच्या आपल्या हा सामूहिक गोंधळात एक नवी
मज्जा आली आहे, ती म्हणजे महापौर बंगल्यात होऊ घातलेल्या स्मारकाची.
ह्याबद्दल लोकसत्ताकारांनी (जे आजच्या घडीचे, भाषांतरकार आणि
गुगल विकीबोले ह्यांच्यानंतरचे एकमात्र नियमित साहित्यपुंगव आहेत) त्यांनी एक
जबरी अग्रलेख लिहिला आहे. अर्थात त्यांना जी (भातो चाचणीनुसार) भाजपाविरोधाची
कावीळ आहे त्यानुसार त्यांनी तो महाराष्ट्राच्या मुख्यसेवकाला उद्देशून लिहिला
आहे. पण त्यात त्यांनी राजा कदाचित नागडा असं तरी म्हणण्याचं धाडस दाखवलेलं आहे. (टीप:
इथे राजा म्हणजे मुख्यमत्री नव्हेत. इथे राजा म्हणजे सम्राट, छायाचित्र सम्राट आणि
ओपनजिम सम्राट)
जे.व्ही.एल.आर. समोर सुरु झालेले रुग्णालय पाहून मला वाटलेलं कि
राडे आणि रजवाडे ह्यांच्या पार्टीने एवढी सेन्सिबल गोष्ट कशी काय केली. J अर्थातच सत्याचा अविष्कार देर आणि दुरुस्त झालेलाच आहे.
मध्ये मी एका मित्राला म्हटलं कि आपण ‘विचारांचं सोनं शब्दकोश’
काढला तर त्यात काय असेल?
एकूण १ लाख शब्द, सगळे ‘शि’
वरून सुरू होणारे,
१००००० शब्द – शिव
उरलेले १०० शब्द परिशिष्टात
– औलाद, औकात, बांबू, माय, हिंमत, मराठी (१० वेळा), अन्याय(१० वेळा), भगवा (१०
वेळा), वाघ(५० वेळा), धनुष्य-बाण(१० वेळा), बाकी रिकाम्या जागा
कोणतीही योजना नसताना, आणि
कोणतेही ‘परम’ ध्येय नसताना केवळ ‘लांडगा आला रे आला’ करून लोकांना एकत्र करता
येतं – ह्या डिमांड आणि सप्लायच्या मेळाचं मला नवल वाटत आलेलं आहे.
--
संस्कृती, इतिहास, वारसा हे सगळं डोक्यावरून जाऊन पालथ्या
पडलेल्या माझ्या पाखंडी मूर्खपणाचे स्मारक म्हणजे ही माझी ब्लॉगपोस्ट.
--
ता.क.
आपण सर्वांना ७ व्या वेतन आयोगाच्या शुभेच्छा. महापुरुष ना होते
तो ये भी न होता था. अब तक छपन्न, अब एक ही छपन्न.