सर्वोच्च न्यायालयाने दही
हंडीच्या संदर्भात काही एक निर्णय १७-८-२०१६ रोजी दिल्याच्या बातम्या वृत्तपत्रात
आल्या. मला ह्या निकालाची/आदेशाची मूळ प्रत मिळू शकलेली नाही. मी ज्या बातम्या
वाचल्या त्यानुसार मला ह्या निर्णयाची दोन महत्वाची वैशिष्ट्ये लक्षात आली आहेत.
खरोखरचा न्यायालयीन निर्देश काय आहे ह्याच्याऐवजी ह्या दोन महत्वाच्या बाबी खरोखर
न्यायालयाने निर्देश केल्या आहेत असे मानून मी पुढील लिखाण करतो आहे.
ह्या दोन बाबी म्हणजे:
१.
दही हंडीच्या थरांची उंची
२० फुटांपेक्षा जास्त नसावी.
२.
१८ वर्षाखालील व्यक्तींना
दही हंडीमध्ये भाग घेण्यास मनाई
न्यायालयाच्या
आदेशाचा आणि त्यापाठी असलेल्या चिकित्सेचा पूर्ण आदर करून मला असं म्हणायचं आहे कि
न्यायालयाने घातलेल्या ह्या अटी मूलभूत मानवी स्वातंत्र्यावर अनावश्यक निर्बंध
घालणाऱ्या आहेत. अर्थात ह्या निर्देशांना होणारा विरोध हा प्रामुख्याने सांस्कृतिक
वगैरे कारणांनी होतो आहे. पण मला वाटतं ज्या न्यायान्वये आपण समलैंगिक संबंध हे
दोन प्रौढ व्यक्तींनी परस्पर संमतीने केलेली आणि अन्य कोणत्याही व्यक्तींना जीवित
किंवा वित्तहानी न पोचवणारी बाब असल्याने त्यांना चूक किंवा कायद्याने गुन्हा
मानले जाऊ नये असे म्हणू शकतो त्याच न्यायाने आपल्याला काही एक प्रौढ व्यक्तींनी किंवा
पालकांच्या बिना-बळजबरी किंवा बिना-फसवणूक किंवा अपरिहार्य नसलेल्या संमतीने
आलेल्या व्यक्तींनी सामूहिक रित्या केलेले कृत्य ज्याने कोणाचीही वित्त अथवा जीवित
हानी होत नाही ते चूक नाही असे म्हणायला लागेल.
इथे उघडपणे एक मुद्दा येतो तो म्हणजे दही हंडी खेळताना
होऊ शकणाऱ्या अपघातांचा. पण शारीरिक इजा हा मुद्दा नसून सहभागी होणाऱ्या
व्यक्तींना ह्या संभाव्य शारीरिक धोक्याची कल्पना नसते का हा आहे. दहीहंडीत सहभागी
होणाऱ्या प्रौढ/सज्ञान/१८ वर्षावरील व्यक्ती आणि त्याखालील कोणत्याही वयाच्या
मुलांचे पालक ह्यांना दहीहंडी खेळताना काय होऊ शकते हे माहित नसते असे समजणे चूक
ठरेल. जर १२ वर्षाच्या मुलांनी प्रशिक्षण घेऊन मल्लखांब करणे चूक नसेल तर
प्रशिक्षण घेऊन दहीहंडीच्या ५व्या अथवा ६व्या थरावर चढणे का चूक आहे?
एकतर दहीहंडीमध्ये एका वर्षी सहभागी होणारे एकूण लोक आणि त्यात
होणाऱ्या इजांची प्रतवारीनिहाय माहिती वापरून दहीहंडीच्या उंचीचा निर्णय देण्यात
आला आहे का ह्याचे मला कुतूहल आहे.
दहीहंडी खरोखर पारंपारिक आहे का (म्हणजे कृष्ण आणि त्याचे साथीदार
खरोखर असं काही करत का?) हा निकष मुळात दहीहंडीबद्दल काही पॉलिसि ठरवायचा निकष असू
शकतच नाही. सहभागी होणाऱ्या प्रत्येकाने स्वतःच्या जाणीवेने दिलेल्या संमत्तीने
घडणारी सामूहिक कृती हेच दहीहंडीचे योग्य वर्गीकरण आहे. आणि अशा कृतींना किंवा
त्यांच्या अशाच आयामांना प्रतिबंधित केले जायला हवे ज्याचे कृतीत सहभागी नसणाऱ्या
लोकांवर त्यांना (सहभागी नसणाऱ्यांना) नको असणारे परिणाम होतात. जर असे आयाम
प्रतिबंधित करूनही असे कृत्य करता येत असेल तर त्याला अडवणे हे चूक आहे.
दहीहंडीमधील थर किंवा त्यातील सहभागी लोकांचे वय ह्यांचा त्यात
सहभागी नसणाऱ्या लोकांवर कुठलाही नकारात्मक परिणाम होत नाही. ह्या दोन आयामांसाठी
अन्य लोक हे केवळ बघे असतात. त्यांचे चुकचुकणे किंवा त्यांच्या भावना ह्या
दर्शकांच्या भावना आहेत. त्या भावनांचा त्यांना त्रास होत असेल तर मुळात दर्शक न
होण्याची निवड त्यांच्याकडे आहे.
पण दहीहंडीचे असे काही आयाम आहेत ज्याचे नकारात्मक परिणाम त्यात
सहभागी नसलेल्या लोकांना कोणतीही निवड अथवा भरपाई न मिळता भोगावेच लागतात. जसे
दहीहंडीसाठी रस्त्यांचा वापर करणे, दहीहंडी जवळ असणारा प्रचंड गोंगाट आणि दहीहंडी
पथकातील काही तरुणांकडून होणारे वर्तन (भरधाव वेगाने, ट्रिपल सीट, वाहतुकीचे नियम
धाब्यावर बसवून बाईक वा अन्य वाहने चालवणे, रस्त्यावरील व्यक्तींना शेरेबाजी
इत्यादी) ह्या वानगीदाखल आणि महत्वपूर्ण काही बाबी आहेत. कदाचित ह्यातील पहिल्या
दोन मुद्द्यांबाबत मुळातच काही कायदेशीर निर्देश असतील. पण त्यांचे फारसे पालन होत
नाही आणि पालन न करणाऱ्या घटकांवर कोणतीही दंडात्मक कारवाईसुद्धा होत नाही.
दहीहंडी हा धाडसी सामूहिक खेळ मानला जावा आणि तो मैदानातच खेळला
जावा. तो रस्त्यावर साजरा होण्याची काय गरज आहे? मुसलमान रस्त्यावर नमाज पढतात
म्हणून आम्ही हिंदूपण रस्त्यावर आमचे सण साजरे करू असं आहे का? का बहुतेक लोकांना
असं रस्त्यावर दहीहंडी असेल तरच संतोष वाटतो आणि बहुमताची दादागिरी म्हणजेच
लोकशाही असं आहे म्हणून दहीहंडी रस्त्यावर होणार आहे का? पण राजकीय नेते आणि सामाजिक
नेतृत्व ह्या कोणालाही ह्याबाबत असणाऱ्या कायद्यांचा आदर किंवा गांभीर्य नाही.
आपल्या राजकीय उपद्रव मूल्याला वाढवण्यासाठी अन्य लोकांना नको असलेले परिणाम जसे
गर्दी, वाहतूक कोंडी, गोंगाट हे सारे देऊन आपल्यापाठी पळणाऱ्या तरुण लोकांची बेगमी
करण्याकरता करायच्या कार्यक्रमातील एक कार्यक्रम म्हणून तो केलाच गेला पाहिजे हे
राजकीय नेत्यांचे धोरण आहे. केवळ जिथे स्थानिकांचे उपद्रवमूल्य जास्त आहे किंवा अन्य
प्रकारचे हित (जसे फारच महत्वाचे रस्ते किंवा औद्योगिक केंद्रे) इथे असे प्रकार घडत
नाहीत. बाकी ठिकाणी कायदा आणि त्याचे रक्षक हे स्थानिक बाहुबलींच्या नेतृत्वामागे
फरफटत जातात.
पण दहीहंडीच्या ह्या नकारात्मक परिणामांबद्दल अधिक ठोस उपाययोजना
करायचे सोडून त्याच्या कोणत्याही प्रकारच्या नियमनांची गरज नसलेल्या आयामांवर रोख
केंद्रित झालेला आहे.
११ थर का २१ थर ह्या त्यात सहभागी होणाऱ्या खेळाडूंचा प्रश्न आहे.
आपल्याला इजा होऊ शकते हे त्यांना कळते. स्वतःच्या हिताचे सर्वात अधिक जाणकार तेच
आहेत.
दहीहंडीत जाणाऱ्या ४ वर्षांच्या अथवा १४ वर्षांच्या पाल्याच्या
पालकांना दहीहंडीमधील धोका कळायला हवा. इथे अशी शक्यता आहे कि पालकांची परवानगी
नसताना पाल्याने सहभाग घेतला आणि त्याला काही शारीरिक इजा झाली. पण कायद्याने हा
सहभाग खरंच थांबेल का? का वयाच्या पडताळणीचा एक नवा मलिदा उत्पन्न होईल? आणि अशा
स्वरुपाची बंदी घालायची असेल तर ती केवळ दहीहंडीवर असून उपयोगाची नाही. अनेक खेळांत
असे संभाव्य धोके आहेत. पालकांनी त्यांच्या पाल्याच्या सुरक्षेची जबाबदारी घ्यायची
असते आणि जर त्यांच्या अपरोक्ष त्याने दहीहंडीत सहभाग घेतला आणि त्यातून काही इजा
उद्भवली तरीही त्याची जबाबदारी पालकांवरच ठेवली पाहिजे. ह्याशिवाय केवळ काही
वयाच्या वरील व्यक्तींना दहीहंडी दुर्घटनेचा विमा उपलब्ध करून देणे अशा उपायांनीसुद्धा
वयोपरत्वे शारीरिकदृष्ट्या पुरेश्या सक्षम नसलेल्या (मी १४ वर्षांखालील अशी
मर्यादा मानेन, पण हे डिबेटेबल आहे) व्यक्तींचा सहभाग घटवता येईल. पण जर आपल्या
५-६ वर्षाच्या मुलाला क्रेन उचलून दहीहंडीच्या सर्वात वरच्या म्हणजे ६ व्या थरावर
ठेवते हे त्या मुलाच्या पालकांना हवेसे असेल तर त्याला बाकी कोणी आक्षेप का
घ्यावा?
अर्थात न्यायालयाच्या निर्णयावरून उठलेल्या धुरळ्यात केवळ राजकीय
पोळी भाजली जाईल असंच दिसतं आहे. बाकी मनोरे लावणारे लावतील, बाकीचे मोबाईलमधून शूट
करतील, बाजूला वूफर्स आणि डॉल्बी दमादम वाजतील. पडणारे पडतील, नुकसान भरपाई घेतील.
वाहतूक पोलीस त्यांना जे मिळायचे ते मिळवून जमेल तशी वाहने हाकतील. धार्मिक स्वातंत्र्य
आहे म्हणून हक्काने सार्वजनिक हिताच्या छाताडावर ते उभे राहील आणि त्याने काही
जणांना खास आनंदही होईल.
बाकी वाढणाऱ्या दरडोई उत्पन्नासोबत तो सिव्हिक सेन्स का काय तोही
वाढेल असे मनोरे काहीजण मनात बांधतील, बांधोत बिचारे.