Skip to main content

गडकरी पुतळा: आहे हे असं आहे

मूळप्रसिद्धी: अक्षरनामा ९ जानेवारी २०१७ (लिंक इथे) इथे प्रकाशित लेखात आणि मूळ लेखात काही बदल असतील. पण ते जुजबी आणि संपादकीय साक्षेपाचे आहेत. 
--
     
          प्रतीके, प्रतिमा आणि ऐतिहासिक व्यक्ती ह्यांच्याबाबतच्या वादात गडकरी पुतळा हा लेटेस्ट किस्सा आहे. शिवस्मारक असो, कोणाच्या मुलाचे नाव असो कि हा पुतळा विस्थापनाचा प्रसंग असो, ह्या सगळ्याच्या सोबत उमटणाऱ्या प्रतिक्रिया प्रतीके, चिन्हे आणि ऐतिहासिक व्यक्ती ह्यांबाबत समाजात काय काय भूमिका आहेत हे दर्शवतात. मी अशा प्रतिक्रिया बघत, त्यावर विचार करत राहतो. ह्या भूमिका आणि ह्या भूमिका नेमक्या काय आहेत आणि त्यांच्याबाबत तर्कसुसंगत विचाराने काय उमजू शकते ह्याचा विचार करणे हा ह्या लिखाणाचा उद्देश आहे. समाजातील कुठल्याही घटनेबाबत वेगवेगळी मते असणे ही नैसर्गिक बाब आहे. पण अनेकदा ही मते केवळ ‘मला वाटतं असं तर असं’ किंवा’ त्यांचं असं तर आमचं का नाही’ अशा भुसभुशीत स्वरुपाची असतात. ह्या वेगवेगळ्या मतांचे  आणि त्यापाठच्या भूमिकांचे परीक्षण हे मतमतांतराचा वाद-संवाद हा निव्वळ उष्णतेपेक्षा काही एक प्रकाश पाडणारा होण्यासाठी उपयुक्त ठरू शकते.  
  इथे ज्या घटनेचे आणि त्यातून उद्भवलेल्या प्रतिक्रियांचे परीक्षण करायचे आहे ती घटना म्हणजे : पुण्यातील छत्रपती संभाजी महाराज उद्यानातून अपरात्री हलवण्यात आलेला राम गणेश गडकरी ह्यांचा पुतळा. ज्या गटाने हे कृत्य केलेले आहे त्यांनी ह्या कृतीचे समर्थन अशा प्रकारे दिलेले आहे: राम गणेश गडकरी ह्यांच्या ‘राजसंन्यास’ ह्या नाटकात त्यांनी छत्रपती संभाजी ह्यांच्याबद्दल अवमानकारक लिखाण केलेले आहे. आणि त्यामुळे अशा अपमान करणाऱ्या व्यक्तीचा पुतळा छत्रपती संभाजी महाराज ह्यांच्या नावाने असणाऱ्या उद्यानात असणं ह्या अपमानकारक बाबीत बदल घडवणे ह्या उद्देशाने हे कृत्य केलेले आहे. 
सोशल मिडीयावर हे योग्य का अयोग्य ह्याबद्दलच्या चर्चांचा धुराळा उठलेला आहे. तेव्हा बोललात, आता का नाही अशा प्रकारची आव्हाने दिली जात आहेत. प्रस्तुत लिखाणाचा उद्देश ह्या चर्चेत पुतळा हलवणे का अयोग्य ह्याची काही स्पष्टीकरणे आली त्यांची छाननी करण्याचा आहे. 
घडलेल्या घटनेचे दोन भाग अलग करून बघायला हवे आहेत. पहिला, म्हणजे ज्या पद्धतीने अमुक एका गटाला हवा असलेला हा बदल घडवण्यात आलेला आहे. दुसरं म्हणजे बदलाची कृती करण्यात आली त्यापाठची भूमिका : २.अ गडकऱ्यांच्या नाटकातील लेखनाने संभाजी महाराजांचा अपमान झालेला आहे. २. ब. अशा नाटककाराचा पुतळा संभाजी महाराजांच्या नावाने असणाऱ्या उद्यानात असणं हा खोडसाळपणे मुद्दामून केला गेलेला) अपमान आहे आणि २.क. जातीचा/गटाचा अभिमान असलेल्यांनी असे अभिमानास्पद प्रतिकांचे अपमान सहन न करता तिथे बदल घडवले पाहिजेत. 
जर आपण २.अ., २.ब. किंवा २.क. पैकी काहीही एक चूक आहे असं दाखवून भूमिकाच चूक आहे असे सिद्ध करू शकत असू तर एकूण कृतीला चूक म्हणता येईल. आणि समजा २ हे चूक म्हणता येत नसेल तर मग ज्या पद्धतीने बदल घडवून आणण्यात आलेला आहे ती पद्धत चूक आहे असं म्हणता येईल का ह्याच्यावरच लक्ष केंद्रित करावं लागेल. 
त्याचबरोबर अपमान म्हणजे काय ह्याचंही थोडं स्पष्टीकरण गरजेचं आहे. 
-- 
‘अपमान’ ही एक फेसव्हॅल्यूवर आधारित, म्हणजे जे घडलं त्यातून निर्माण होणारी आणि पाठचा उद्देश लक्षात घेणे गरजेचे नसलेली बाब आहे. अमुक  एका गोष्टीला जी deserved treatment (लिखाणात, स्थानात, प्रत्यक्ष वागणुकीत) मिळायला हवी होती ती न मिळणं ह्याला त्या गोष्टीचा ‘अपमान’ मानलं जातं. इथे महत्वाचा मुद्दा आहे deserved treatment.  म्हणजे मला जर मान-अपमान हा सेन्स नसेल तर मला माझ्या कॉलेजने एखाद्या समारंभात कुठे बसायला लावलं ह्याचं मला काहीही वाटणार नाही, पण जर मला हा सेन्स असेल तर मी कुठली जागा deserve करतो आणि कोणती नाही ह्याबद्दल माझी एक अपेक्षा असेल आणि तसं घडलं नाही तर मी त्याला अपमान मानेन. 
सामाजिक पातळीला सुद्धा हीच व्याख्या लागू पडते. अमुक एक ऐतिहासिक व्यक्तीबाबत लिखाण असेच होऊ शकते आणि असे नाही अशा अपेक्षा काही गटांच्या असतात. त्यातून पुढे ही अजिबात लागू नसलेला मान दिला किंवा अपमान केला अशा भूमिका बनतात आणि तदनुषंगाने काही मागण्या केल्या जातात. 
सामाजिक स्तरावर अशा ‘अपमान’ मानण्याला काही अर्थ असतो का हा प्रश्नच गैरलागू आहे. लोक असं मानतात हे एम्पिरीकल सत्य आहे. असं असतं हे मानूनच आपल्याला विचार करावा लागणार आहे. 
‘ऐतिहासिक महाव्यक्तींचा, प्रतिमांचा, चिन्हांचा अपमान’ अशी काही बाब असते हे आपण मानणार असू तर it’s a high time कि त्याबाबतीत काही अधिक व्यापक कायदेशीर तरतूदीच करून ठेवायला हव्यात. म्हणजे अशी एक यादी आणि त्या यादीतील वस्तूंचा केवळ सन्मान पूर्वक उल्लेख करण्याचा निर्बंध, विनोदी वापरावर बंदी आणि अन्य तरतुदी असलेला कायदाच आणावा.  अशी मागणी आनंद यादवांची जी controversy झाली तेव्हा झालीच होती. आणि उपयुक्ततावादाने (Utilitarianism) विचार केला तर जर असा कायदा केल्याने अधिक नक्त फायदा होणार असेल तर कितीही absurd वाटलं तरी असा कायदा हीच फायद्याची गोष्ट आहे. पण मुळात अशी एक स्थिर यादी बनू शकणार नाही आणि यादीत बदल जरी शक्य असले तरी मुळात बदल घडवण्याचा मार्ग हा असंवैधानिक किंवा गैर मार्गाने सरकारवर दबाव आणणे हाच आहे हीच जर राजकीय गटांची समजूत राहणार असेल तर अशा कायद्यानेही काही होणार नाही. समाज आणि समाजाचे प्रतिनिधित्व करणारे सरकार ह्यांनी अशा मार्गांच्या दंडेलीसमोर हतप्रभ राहणे हाच इक्विलीब्रीयम किंवा शिरस्त राहणार आहे आणि अशी दंडेली हाच राजकीय बल गोळा करण्याचा मार्ग असे निराशाजनक भाकीत करावे अशीच अवस्था आहे. असो. अपमान म्हणजे काय हे पुरेसे स्पष्ट झाल्याचे धरून प्रतिक्रियांचा चर्चेकडे वळू.
--
पुतळा हटवण्याच्या घटनेने व्यथित झालेल्या व्यक्तींनी जे घडलं ते का चूक होतं ह्याची काही स्पष्टीकरणे दिलेली आहेत. त्यात माझ्या वाचनात आलेल्या दोन महत्वाच्या मांडणींचा मी इथे विचार करणार आहे. 
ह्यातले पहिले, आणि अगदी सहज सुरुवातीला आलेलं अर्ग्युमेंट आहे ते म्हणजे गडकरी ह्यांनी नाटकातील एका पात्राच्या तोंडी घातलेला संवाद ही काही त्यांची भूमिका असू शकत नाही. अर्थात हा बचाव अत्यंत तोकडा आहे हे लगेचच संबंधित व्यक्तींच्या लक्षात आलं असावं. नाटकातील संभाजी हा स्वतःबद्दल हे वाक्य वापरतो आहे. मग ही नाटककाराची नाटकातील संभाजीबद्द्लची भूमिका आहे, त्याची व्यक्ती म्हणून स्वतःची नाही असा डिफेन्स करण्याचा हा प्रयत्न होता. अर्थात ही भूमिका ही फारच लिबरल भूमिका आहे आणि मुळात ह्या घटनेने हताहत झालेल्या लोकांत बहुतेकजण हे श्रद्धाधारित (धर्म, जात, भाषा ह्या आमच्या मूलभूत आयडेंटिटी आहेत आणि त्याच राजकीय आणि सामाजिक जीवनाचा आधार असाव्यात अशी समजूत ह्या अर्थाने ‘श्रद्धा’ हा शब्द वापरलेला आहे. अशा व्यक्तींच्या मांडणीत पुरावे, तर्कशुद्ध मांडणी, विरोधी मताचे सुसंगत खंडन ह्यांचा अभाव दिसून येत असल्याने किंबहुना त्यांची गरजच उरत नसल्याने त्यांना ‘श्रद्धा’ म्हणण्यात आलेलं आहे.) सांस्कृतिक संघटनांचे समर्थक असल्याने ते एवढ्या लिबरल भूमिकेतून डिफेन्स देतील हे फार काल्पनिक आहे. कारण त्यांचा डिफेन्स असा लिबरल व्ह्यूवर आधारित असेल तर त्यांनी आजवर कोणाच्या चित्रांवर, कोणाच्या सिनेमांवर केलेला हल्ला हा दुटप्पीपणा ठरेल. (अर्थात आपल्या कृतीत दुटप्पीपणा नसावा अशी श्रद्धाधारित समर्थकांची अट नसतेच. आपला तो बाब्या आणि तुमच्या वासराला आमची गाय किंवा वासरू हेच त्यांच्या एकून कृतींचे निकष असतात.) पण एकूणच नाटकातले संभाजी राजांचे पात्र स्वतःबद्दल जो संवाद बोलणार आहे ती गडकरी ह्यांची भूमिका नव्हती हा बचाव तसा दुबळा असल्याने मागे पडला. 
दुसरा बचाव आला तो म्हणजे गडकरी ह्यांनी जे लिहिलं ती त्यांची भूमिका ठरते. पण ही भूमिका तत्कालीन उपलब्ध पुराव्यांवर आधारित होती जे जाणीवपूर्वक निर्माण करण्यात आलेले खोटे पुरावे होते. म्हणजे बखर लिहिणारे चिटणीस व्हिलन आहेत आणि गडकरी त्याच्या सापळ्यात अडकलेले असा हा डिफेन्स आहे. अपमान झाला आहे, पण तो जाणीवपूर्वक नाही, तर चुकीच्या माहितीने झालेला आहे, नकळत झालेला आहे अशी ही भूमिका आहे. 
ह्या भूमिकेची तार्किक परिणीती म्हणून कोणी असं म्हटलं कि ‘बरं! मग ‘राजसंन्यास’ नाटक जाळूया आणि ते आपल्या इतिहासातून रद्द करूया, कारण ते चुकीच्या पुराव्यांवर आहे. चिटणीसाची बखर नष्ट करूया कारण तो जाणीवपूर्वक लिहिलेला खोटा पुरावा आहे.’ तर हा डिफेन्स मांडणारे काय म्हणतील? 
खरंतर हा डिफेन्स पुतळा हलवायची कृती थोडी जस्टीफाय करतो. चुकली असेल कृती, पण प्रेरणा चुकीची नव्हती हे बळ तो ह्या कृतीला देतो, फक्त पुतळा ज्या व्यक्तीचा आहे तिने मुद्दामून केलं नव्हतं हो असा बिचारा सूर तेवढा लावला जातो.
-- 
अपमान म्हणजे काय ह्याची वर झालेली मांडणी लक्षात घेतली तर गडकरी ह्यांनी अपमान केला होता का नाही ह्या प्रश्नांचं उत्तर जर आपण असा ‘ऐतिहासिक व्यक्ती, घटना, चिन्हे, प्रतीके’ ह्यांचा अपमान असतो असं मानणारे असू तर अमुक एका गटाच्या लेखी अपमान घडलेला असण्याची शक्यता आहे असंच देऊ शकतो. आणि जर आपण असे अपमान मानणारे नसू तर आपल्याला काहीच उत्तर देता येणार नाही. (‘आंब्याच्या झाडाने पारिजताकाच्या झाडाला धडक देणे योग्य आहे का?’ ह्या प्रश्नाचे उत्तर वनस्पतीशास्त्रज्ञाकडे असूच शकत नाही. प्रश्न विचारणारा अशी धडक होऊ शकते हे मानतो आहे आणि उत्तर ज्याला विचारले आहे तो अशी धडक व्हायची शक्यता नाही असे मानणारा आहे. ह्यात प्रश्न-उत्तर काय होणार!) पण ‘अपमान झालेला नव्हता’ हे उत्तर कोणीच देऊ शकणार नाही. 
घडलेल्या घटनेत निःसंदिग्धपणे चूक आहे असं म्हणता येईल ते केवळ पुतळा हलवण्याच्या पद्धतीला. आणि असं चूक बहुतेकांनी म्हटलेलं आहे. असं म्हणणाऱ्यात दुटप्पी श्रद्धावादी आहेत (जे त्यांच्या गटाने केलेली अशीच कृती ही योग्य मानतात किंवा तिची तुलना अप्रस्तुत मानतात.) आणि लोकशाहीवादी आहेत जे अशा पद्धतीच्या साऱ्याच कृतींना चूक मानतात.   
त्यामुळेच अनेक विचार करू शकणाऱ्या (नेहमी करणाऱ्या नव्हे!) संस्कृतीवाद्यांनी ‘कृतीचा तरीका चुकला असेल कदाचित’ असा चुकचुक स्वर तेवढा लावलेला आहे. अपमान नव्हता झाला हे काही त्यांना म्हणता येत नाही. संस्कृतीवाद्यांमधील जात्याभिमानी जे आहेत ते मात्र नेमक्या जागी आघात बसल्यागत कळवळत आहेत. बुद्धिवाद्यांची किंवा व्यक्तीस्वातंत्र्यवादी लोकशाही समर्थकांची भूमिका ही मात्र कृती चुकली अशी आहे. त्यापाठचा उद्देश किंवा बदलाची डिमांड ह्याबाबत ह्या गटातही दोन भाग आहेत. इतिहास, प्रतिमा, चिन्हे ह्या गोष्टींना कुठे धरून बसता अशी एक टोकाची आणि अल्पसंख्य भूमिका किंवा ठीके, तुम्हाला इश्यू असेल पुतळा तिथे असावा ह्याबाबतीत, पण मग संवैधानिक (महानगरपालिकेत ठराव आणून किंवा न्यायालयाचा मार्ग अवलंबून) किंवा क़्वाझाय-संवैधानिक मार्गांनी (मोर्चे, आंदोलने करून) सरतेशेवटी संवैधानिक मार्गांनी तो करायला हवा असे हे दोन फाटे आहेत.
--
पुणे महानगरपालिकेने पुतळा त्याच जागी परत बसवायचा ठराव मंजूर केलेला आहे आणि ते असं करतील तर खरोखर ती कौतुकास्पद बाब असेल. समाजातील संख्याबळाने आणि साधनबळाने (ही दोन्ही कोरीलेटेडही असतात, पण दरवेळी असतात असे नाही.) प्रबळ गटांचा प्रभाव लोकशाही शासनप्रणालीच्या निर्णयांवर पडतो ही सर्वत्र आढळणारी बाब आहे आणि त्याविरुद्ध नैतिक आक्रोश केला तरी ती जर ती संविधानात्मक मार्गाने अंमलात आणली असेल तर तिला गैर म्हणता येऊ शकत नाही. लोकशाहीचे स्वरूप आपण मानू अगर न मानू पण बहुमताची, संख्याबळाची दंडेली हेच आहे. त्यावर न्यायव्यवस्था, संविधान हे अंकुश आहेत, पण सरतेशेवटी अंकुशधारी परत बहुमताने निवडून येणारे शासनच आहे आणि हे शासन शेवटी त्याला मत देणाऱ्या गटांचे एक्स्प्रेशन्स अधिक ठळकपणे मांडणार आहे. हे असं आहे. पण हे असं करताना वापरायचे मार्ग हाच काय तो चूक-बरोबर वादाचा मुद्दा असू शकतो. लोकशाहीची चौकट, स्वतःहून किंवा अपरिहार्यपणे, मानणाऱ्या कोणासाठीही गडकरी पुतळ्याच्या घटनेत चुकीचा मार्ग वापरलेला आहे हे स्पष्ट आहे. असं म्हणताना किती थेट म्हणायचं किंवा नाही ह्याची बरीच व्हेरिएशन्स आहेत. 
लक्षात हे घ्यायला हवं कि चुकीच्या मार्गाची निवड भावनिक, अल्प विचारातून नाही, तर पद्धतशीर (systematic) आहे, विचारांती आहे. ह्या कृत्याने जेवढ्या शिव्या मिळतील तेवढ्याच किंवा त्याहून अधिक दुवाही हा हिशोब स्पष्ट आहे. ह्या घटनेचा निषेध जेवढ्या हिरीरीने आलेला आहे तेवढ्याच हिरीरीने तिचे समर्थनही पुढे आलेले आहे. ह्या समर्थनाचा फोकस काही व्यक्तींनी त्यांच्या गटाव्यतिरिक्त अन्य गटांचा जाणीवपूर्वक उपमर्द आणि हानी करण्यासाठी चुकीचा इतिहास आणि ऐतिहासिक वाटणारे खोटे समाज निर्माण केले हा आहे. संस्कृतीवाद्यांचे ‘ब्रिटिशांनी किंवा पाश्चिमात्यांनी भारतीयांची हानी करण्यासाठी खोटा इतिहास निर्माण केला’ हे जे आवडते अर्ग्युमेंट आहे तसेच, पण त्याच्यापेक्षा छोट्या विस्ताराचे हे अर्ग्युमेंट आहे. 
इतिहास म्हणून आज जे आपण मानतो त्याचे परीक्षण सतत होत रहावे ह्याबाबत विचार करू इच्छिणाऱ्या कोणाचे दुमत नसेल. पण ह्या परीक्षणाची दृष्टी वैज्ञानिक असावी. विज्ञान हे कशालाही ‘सत्य’ मानत नाही. अमुक एक हायपोथेसिस नाकारण्याएवढा सबळ पुरावा नाही म्हणून तो तूर्तास नाकारलेला नाही हीच वैज्ञानिक भूमिका असते. आणि प्रत्येक गोष्ट अशा पुराव्यांच्या पद्धतीने तपासता येईल असा दावाही विज्ञान ठोकत नाही. पण पुराव्याने तपासता येत नाही म्हणून असे विधान, असा क्लेम काही खरा, सत्य किंवा स्वीकारण्याजोगा ठरत नाही. (उदाहरणार्थ, सहा पायांचा मनुष्य हा अत्यंत बुद्धिमान असतो’ हा वाक्याला खरे किंवा खोटे काही म्हणता येणार नाही.) इतिहासातील अनेक विधाने ही अशाच प्रकारची असू शकतात. आपल्याला स्वीकारावीशी न वाटणारी अशी विधाने तपासून पहावीत आणि त्यांच्यातील त्रुटी नजरेला आणून द्याव्यात ह्याला बंधन नसावे. पण आपल्याला कोणत्याही कारणास्तव डाचणारे, खुपणारे जे काही आहे ते केवळ बळाच्या आधारावर नष्ट करावे ही बाब, भले त्यापाठची प्रेरणा योग्य असेल हे पुढे सिद्ध झाले तरी, चुकीची आहे. कारण ह्यातून जेवढे भले साधते त्याहून अधिक नुकसान होते. अशा घटनांचा पूर्ण परीघ लक्षात न घेता अनेक व्यक्ती स्वतःच्या जाती, भाषा, धर्म आधारित बाजू पक्क्या करतात. अनेक व्यक्ती, ज्यांनी आजवर अशी कोणतीही बाजू स्वीकारलेली नसते, त्यांच्यासाठी अशी कोणती न कोणती घटना उंटावरची शेवटची काडी ठरते. ‘भारतीय’ ही भारतातील व्यक्तींची भारतातील सामाजिक आणि राजकीय व्यवहाराची प्राथमिक आयडेंटिटी बनण्याच्या मुळातच दूर असलेल्या उद्दिष्टापासून आपण अजून दूर फेकले जातो. 
 ‘म्हातारी मेल्याचे दुःख नाही, पण काळ सोकावला’ ह्यातून जे मांडले जाते तेच ह्या घटनांना  आणि त्यासोबत निर्माण होणाऱ्या प्रतिक्रियांना लागू पडते. आपल्या राजकीय उद्दिष्टांच्या प्राप्तीसाठी असंवैधानिक साधने वापरणे लेजीटीमेट आहे हे अशा घटनांनी पुरेसे प्रस्थापित करून सोडलेले आहे. आणि ह्या घटनांच्या प्रतिक्रिया ह्या धृवीकरणाचे काम चोख पार पाडतात. घटनेचे समर्थन करणारे आणि निंदा करणारे दोन्ही गट आपापल्या जाळ्यांत अधिक मासे पकडण्याचे आमिष म्हणून आपल्या प्रतिक्रिया वापरतात. घटना घडून जातात, चर्चेचा धुराळा उठतो आणि पहिला शमताना दुसरा येतो. आणि प्रत्येक धुराळ्यागणिक अभिमान आणि द्वेष ह्यांवर आधारित टोळ्या अधिक बळकट होतात. कितीही वाईट वाटले तरी आहे हे असे आहे.   

Popular posts from this blog

Why exit polls got it so wrong?

Results of India general elections 2024 have thrown a surprise no one saw coming. NDA has secured a majority but BJP on its own has failed to secure the majority, unlike last two general elections.                No exit poll predicted this scenario. As per exit polls, BJP was going to reach majority mark on its own and NDA was going to win about 350 seats. But BJP has won 240 seats and NDA has won 292 seats. The results seem to be beyond the confidence intervals projected for the prediction. What does that say about exit polls? There are multiple possible answers to this question. I will rule out conspiracy answers at the outset. I am not going ahead with argument that exit polls were staged to help some agents. One interesting possibility that I might want to consider is false answers from voters. Respondent’s response to exit poll enumerator can be a strategic choice if respondent thinks that revealing what she...

Balia suffers and Mumbai stares

  More than 100 have died in Balia and Deoria district of Uttar Pradesh in last few days . These districts have experienced heatwave conditions. IMD has given orange alert warning (40℃ to 45℃) for these as well as other districts in Eastern Uttar Pradesh. For those who are aware, Kim Stanley Robinson’s Climate fiction ‘The Ministry for the Future’ opens with a stunning description of heatwave related deaths in Uttar Pradesh. What is happening now in Deoria and Balia district has uncanny resemblance to what author has imagined. In some sense, we have been made aware of what awaits us, though we have decided to bury it because it is inconvenient. Even now, these deaths are not officially attributed to heatwave. Here is what I think have happened. It is a hypothesis rather than a statement with some proof. Balia and Deoria are districts near Ganga, a large water body. Rising temperatures have caused greater evaporation of this water body leading to excessive humidity in the surr...

Maharashtra Politics in June 2022 – It is perhaps a dissent against NCP and not BJP influenced coup

 It’s been a week since a political turmoil erupted in Maharashtra. Week ago, the rebellion looked like a coup covertly sponsored by BJP. But after a week, I see it somewhat differently. Image source: Here               I think the rebellion is truly a rift between Shivsena MLAs and NCP. MVA has become a ruse set up by NCP. Thackeray family have been catered while remaining leadership of Shivsena has been deprived from exploiting the power. It is a different issue why NCP must do this to Shivsena and we will not discuss that in depth here except some passing remarks. Perhaps such opportunism is a defining trait of NCP politics. We must remember that NCP is a party borne out of an ambition nourished on opportunism.             Why it is a rift between Shivsena leadership barring Thackeray and NCP? Because if it is a BJP orchestrated coup then there would have been s...