पुस्तक ह्या गोष्टीला एक वलय आहे. पुस्तके वाचणे म्हणजे काही विशेष असा समज पुस्तके वाचणाऱ्या लोकांचा आणि न वाचणाऱ्या अशा दोन्ही लोकांचा असल्याचे दिसून येते. खरेतर पुस्तके लिहिणाऱ्या लोकांनी स्वतःच्या हितासाठी हा समज पसरवला असल्याची शक्यता फार जास्त आहे!
अनेक लोक वाचतात ते मनोरंजनासाठी. काही जणांना उपजीविकेसाठी वाचन करावे लागते. ज्ञान मिळवण्यासाठी वाचन करावे लागते ह्यासारखी अंधश्रद्धा दुसरी नाही. ज्ञान मिळवण्यासाठी विचार करावा लागतो, आत्मपरीक्षण करावे लागते आणि ज्ञान हे वाचनाशिवायही गवसू शकते. बुद्धाने कोणती पुस्तके वाचली होती हे आपल्याला ठाऊक आहे का?
आपले जीवन सुसंगतीने जगू इच्छिणाऱ्या व्यक्तीला पुस्तकांचा फायदा होतो. अन्य व्यक्तींनी केलेले प्रयोग, त्यांना भेडसावणारे प्रश्न, त्यांनी शोधलेले पर्याय हे त्याला आपोआप समजू शकतात. संशोधक लिटरेचर रिव्ह्यू ह्याच उद्देशाने करतात. त्यांचा रिसर्च अगोदरच झालेला असेल तर ते पुनरावृत्ती टाळून पुढे जाऊ शकतात.
पण वाचन हे प्रामुख्याने रंजन म्हणून केले जाते. आणि आज रंजनाची अनेकविध साधने आल्यावर वाचन आपले मुख्य स्थान गमावून बसले आहे. ह्याचा मोठा फटका वाचनाचा सप्लाय करणाऱ्या लोकांना बसलेला आहे. त्यातच ग्लोबलायझेशनमुळे जगातल्या विविध कानाकोपऱ्यात एकजिनसी मार्केटी वागणे पसरत चाललेले आहे. ह्या मार्केटची भाषा एकतर इंग्रजी आहे किंवा त्या त्या देशाची भाषा आहे. त्यामुळे प्रादेशिक भाषांतील वाचनाच्या सप्लायर्सना कठीण दिवस आहेत.
पाहणे आणि ऐकणे ह्यापेक्षा वाचणे कठीण आहे. जे सोपे आहे ते अधिकाधिक लोकांपर्यंत पोचणार आहे. त्यामुळे व्हिज्युअल मिडिया हा रंजनाचा मोठा पर्याय होऊन जाणार आहे.
अर्थात वाचणारे संपतील का? नाही! वाचनाच्या अनुभवाची डिमांड राहणारच. पण ही डिमांड सर्व भाषांना सारखी नसणार. प्रादेशिक भाषांतील वाचन रोडावणार आहे. आणि वाचनाची डिमांड रोडावल्याने हळूहळू सप्लायही रोडावणार आहे.
माझ्या शहरातील सार्वजनिक वाचनालयाने त्यांच्या संग्रहातील संदर्भ आणि दुर्मिळ पुस्तकांचे प्रदर्शन बघताना मला त्या संदर्भ पुस्तकांकडे बघताना त्या पुस्तकांच्या भयाण एकाकी असण्याची जाणीव झाली. मराठीत व्यायामज्ञानकोश आहे, संकल्पनाकोश आहे. असे ग्रंथ लिहिणाऱ्या लोकांची जिद्द प्रचंड असणार. ही पुस्तके कोणी वापरली, ती छापायला कोणी व का रिसोर्सेस दिले असे प्रश्न मला पडले. दुर्मिळ पुस्तकांकडे बघताना मला गंमत वाटली. बहुतेक दुर्मिळ पुस्तके ही आउट-ऑफ-प्रिंट असलेली आहेत. एखाद्या पुस्तकाची प्रत परत का छापली जात नाही? कारण त्याला डिमांड नाही. म्हणजे आजची दुर्मिळ पुस्तके ही काळाची फ्लॉप पुस्तके आहेत. त्यांचे दुर्मिळ असणे हे त्यांच्या मौल्यवान असण्यापेक्षा त्यांच्या मूल्यहीन असण्याचे लक्षण असण्याची शक्यता अधिक आहे. पण एखाद्या गोष्टीने बराच काळ अस्तित्व ठेवले कि तिला सम्मान द्यावा ह्या नात्याने त्या पुस्तकांना प्रदर्शनात स्थान दिलेले आहे.
सरकारी निधीवर चालणाऱ्या वाचनालयांचा डेटा मिळाला तर मराठीतील वाचनस्थितीचे बरे आकलन होईल. मागच्या ३० वर्षांतील प्रत्येक महिन्याच्या शेवटी असणारी सभासदांची संख्या एवढा आकडाही रोचक असू शकतो.
सो, मराठीतील रंजक आणि अन्य पुस्तके ह्यांचे भविष्य धोक्यात आहे असा माझा अदमास आहे. पण ह्यामुळे मला कुठलेही ठुसठुसणारे भावनिक गळू झालेले नाही. अमुक एक भाषेतील पुस्तक हे संवादाचे माध्यम आहे. संवाद महत्वाचा आहे, माध्यम दुय्यम आहे. माध्यमे जीर्ण होणार, उत्क्रांत होणार, संपणार, पुन्हा सापडणार. कोणत्या भाषेशी आपली पहिली ओळख झाली हा आपल्या हातात नसलेला अपघात आहे.
मराठी भाषेला धोका नाही. तिच्यापाठी संख्या आहे आणि मराठीतील व्हिज्युअल मिडिया झपाट्याने फैलावत आहे.
मराठीतील पुस्तकांना जरूर धोका आहे. कारण मराठी पुस्तके वाचण्याची डिमांड रोडावणार आहे आणि मराठीतील पुस्तकांचा सप्लाय इंग्रजीतील पुस्तकांच्या तुलनेत कमी प्रतीचा राहणार आहे. ह्यांत मराठीतील लेखक कमी प्रतीचे असल्याचा भाग नाही. इंग्रजीतून वाचता येणाऱ्या मानवी जीवनाच्या तऱ्हा खूप जास्त आहेत. मराठीला इतिहास आणि भूगोलाची कैद आहे. माझी रंजनाची गरज भागवताना इंग्रजीचा कंटाळा म्हणून मी मराठीकडे वळतो, रुचीपालट म्हणून.
असो.