सैन्यात सामाजिक गटांचे प्रमाण काय
आहे आणि सैनिकी कारवाईत मरणाऱ्या सैनिकांत सामाजिक गटांचे प्रमाण काय आहे हे दोन
वेगळे प्रश्न आहेत. राजू शेट्टी ह्यांचा खोडसाळ आणि राजकीयदृष्ट्या पोटेंट प्रश्न
हा ‘सैनिकी कारवाईत मरणाऱ्या सैनिकांत सामाजिक गटांचे प्रमाण काय आहे’ हा आहे आणि
त्याला आलेले प्रतिवाद ही ‘सैन्यात सामाजिक गटांचे प्रमाण काय आहे’ ह्या प्रश्नाची
वैयक्तिक स्तरावरची मते आहेत, जी वैयक्तिक माहितीवर आधारित आहेत. पहिल्या
प्रश्नासाठी डेटा नाही आणि दुसऱ्या प्रश्नासाठी डेटा परिश्रमपूर्वक गोळा करावा
लागेल. पण एका theoretical उदाहरणाचा
वापर करून मी ह्या दोन्ही प्रश्नांबाबत काही मते मांडणार आहे.
‘अ’ आणि ‘ब’ हे दोन आर्थिक(जसे
उच्च/मध्यमवर्गीय आणि न-गरीब पण सुखवस्तूही नाहीत असे) गट आहेत. त्यांचे समाजातले
प्रमाण समजा, ५% आणि ५०% आहे. (म्हणजे बाकीचे गट इथे लक्षात घेतलेले नाहीत.)
सैन्यात जाण्याचा ओढा दोन्ही गटांत सारखाच आहे आणि अन्य सामाजिक गटांमध्येही
सारखाच आहे. थोडक्यात सैन्यातही त्यांचे प्रमाण ५% आणि ५०% च आहे. पण सैन्यातील
प्रत्येक स्तरावर हे प्रमाण सारखे नाही. ‘अ’ गट हा वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये जास्त
आढळतो (म्हणजे ५% हून अधिक) आणि कनिष्ठ पातळीत(जवान/सैनिक) कमी (५% हून कमी).
ह्याच्या उलट स्थिती ‘ब’ गटाची आहे.
जीवावर बेतू शकणाऱ्या कामगिरीसाठी
सैन्याचे एकक नेमले जाते, त्यांत वरिष्ठ अधिकारी थोडे आणि कनिष्ठ अधिकारी/सैनिक
जादा असणार हे स्वाभाविक आहे, कारण अधिकारांची अशी उतरंड असते. समजा असे १०००
लोकांचे एकक आहे. त्यांत १०० वरिष्ठ अधिकारी आहेत आणि बाकी ९०० जवान आहेत. १००
वरिष्ठ अधिकाऱ्यांत २० लोक ‘अ’ गटातले आहेत आणि ४० लोक ‘ब’ गटातले आहेत. उरलेल्या
९०० लोकांत ४६० लोक ‘ब’ गटातले आहेत आणि ३० लोक ‘अ’ गटातले आहेत. कामगिरी जरी १०००
लोकांना दिलेली असली. तरी त्यांत जीव जाण्याची जोखीम जवानांना जास्त आहे. समजा
अधिकाऱ्यांचा जीव जाण्याची शक्यता १०% आहे आणि जवानांचा जीव जाण्याची शक्यता २०%
आहे. म्हणजे कामगिरीच्या शेवटी कर्तव्य बजावताना जीव गमवावा लागला अशा व्यक्तींचे
सामाजिक गट कसे असू शकतात: वरिष्ठ अधिकारी: ‘अ’ मधील २ आणि ‘ब’ मधील ३. जवान: ‘अ’
मधील ‘६’ आणि ‘ब’ मधील ‘९२’. केवळ सामाजिक गटांचा विचार केला तर ‘अ’ मधून ८ आणि ‘ब’
मधून ‘९५’. म्हणजे जीवावरच्या जोखीमीची शक्यता ‘अ’ गटाला ५०मध्ये ८ – १६% आहे आणि
‘ब’ गटाला ५०० मध्ये ९५ म्हणजे १९% आहे.
जीवावर बेतले गेले अशा १९० लोकांत
(१० अधिकारी आणि १८० जवान) ‘अ’ गटाचे ८ आहेत (४.२%) आणि ‘ब’ गटाचे ९८ आहेत (५१.६%).
हीच आकडेमोड थोडी टोकाची गृहीतके
घेऊन केली तर काय दिसेल? समजा सैन्यात ‘अ’ गट केवळ ३% आहे आणि ‘ब’ गट ६०% आहे. ‘अ’
गटातल्या व्यक्ती ह्या अधिकारी म्हणूनच लागतात. आणि जवानांमध्ये ‘ब’ गटाचे प्रमाण
६५% आहे आणि अधिकाऱ्यांमध्ये १५%. अशावेळी मृत्युमुखी पडणाऱ्या व्यक्तींत ‘अ’
गटाचे प्रमाण असेल १.६% आणि ‘ब’ गटाचे प्रमाण असेल ६२.४%.
थोडक्यात
- लष्करात नोकरी करायला जाण्याचे आणि समाजातील गटाचे प्रमाण
- लष्करात अधिकारी आणि जवान ह्यांतील सामाजिक गटाचे प्रमाण
- अधिकारी आणि जवान ह्यांना मृत्यूचा असणारा वेगवेगळ्या
प्रमाणातील धोका
ह्या तीन घटकांमुळे जीव गमवाव्या लागलेल्या सैनिकांतील सामाजिक गटांचे प्रमाण हे त्यांच्या समाजातील प्रमाणापेक्षा आणि
त्यांच्या लष्करातील प्रमाणापेक्षाही वेगळे असू शकते. समाजाच्या प्रगत वर्गातील
व्यक्ती, ज्या समाजाचा संख्येच्या प्रमाणात छोटासाच गट असतात (इथे सामजिक गटच असेल
असे नाही, श्रीमंत किंवा न-गरीब अशा आर्थिक दृष्टीनेही बघता येईल.), त्या लष्करात
जाण्याची शक्यता अन्य गटांच्या तुलनेने कमी असते, अशा व्यक्ती लष्करात गेल्याच तर
त्या उच्च अधिकारी होण्याचीच शक्यता जास्त असते आणि बाकीच्या गटासाठी ती कमी असते.
कारण अधिकाऱ्यांच्या भरतीसाठी लागणारी शारीरिक तसेच बौद्धिक क्षमता असण्याची शक्यता,
जी उत्पन्नाशी जोडलेली आहे, ती अशा गटाला जास्त असते. (आणि सामाजिक गटांवर आधारित
सकारात्मक भेदभाव (positive/affirmative discrimination) हा सैन्यभरतीत वापरला जात नाही.) साहजिकच कुठल्याही
स्वेच्छेच्या सैनिकी सेवेत मृत्यू पावणाऱ्या सैनिकांत एखाद्या गटाचे (आर्थिक अथवा
सामाजिक) सामाजिक प्रमाणाहून बरेच कमी अथवा जास्त असू शकते. पण हे प्रमाण कोणी
मुद्दामून घडवलेले नाही. तो लोकांच्या स्वतंत्र निर्णयांचा परिणाम आहे.
त्यामुळेच राजू शेट्टी ह्यांचे
विधान खोडसाळ ठरते. त्यांच्या विधानापाठी असणारे प्रमाणाचे जजमेंट खरे आहे, पण
त्यांनी विधान अशा पद्धतीने वापरले आहे कि जणू एक सामाजिक गट दुसऱ्या गटाविरुद्ध
काही कट करतो आहे किंवा स्वतःच्या कर्तव्यापासून दूर पळून इतरांना हानी पोहचवतो
आहे. समाजातील आर्थिक ताकद ही सामाजिक गटांचा परिपाक असल्याने आर्थिक गटांमुळे
येणारा फरक हा सामाजिक गटांमुळे आहे असा भास निर्माण होतो. पण हा फरक सामाजिक
गटांमुळे नाही, तर आर्थिक अवस्थेचा आहे.
सैनिकांच्या मरणाला अशा
आकड्यांच्या पद्धतीने पाहायचा प्रयत्न अमानवी वाटण्याची शक्यता आहे. पण बहुतेकदा
भावनेच्या भरात केलेल्या वादाने केवळ त्रासदायक उष्णता निर्माण होते, पण थंड
डोक्याने केलेल्या चिकित्सेने प्रकाश निर्माण होतो हे सुज्ञांस ठाऊक आहेच.