फैज अहमद फैजची ‘हम देखेंगे’ ही कविता हिंदूविरोधी आहे का अशा आशयाचा
वाद सुरू आहे. ही कविता शोषितांचा आवाज आहे, जुलुमी राजवट संपून समतेचे
राज्य येईल असा आशय व्यक्त करणारी कविता आहे असा जनरल समज आहे.
मी ही कविता पहिल्यांदा कोक स्टुडीओमध्ये ऐकली होती. कवितेची सर्वात
अपिलिंग बाब आहे तो म्हणजे त्यातला विश्वास, ‘हम देखेंगे’. पण
अगदी पहिल्या वेळेला ऐकतानाही त्यातल्या इस्लामिक संदर्भांनी मला प्रश्न पाडले
होते. म्हणजे वर्गसंघर्षाचे, विषमता आणि समता ह्यांच्या संघर्षाचे चित्रण
करणाऱ्या कवितेत धार्मिक संदर्भ का असावेत? आणि हे धार्मिक संदर्भ कविबद्दल,
त्याच्या हेतूबद्दल काय सांगतात?
कवितेत धार्मिक संदर्भ आहेत ही निर्विवाद गोष्ट आहे. पण कवितेत धार्मिक
संदर्भ धार्मिक हेतूंसाठीच आहेत का हे निर्विवाद नाही. कवितेतले धार्मिक संदर्भ हे
रूपकात्मक आहेत असं मला वाटतं. म्हणजे इस्लामच्या नावाखाली स्वार्थ साधणारे दांभिक
व्यक्तिकेंद्री राज्यकर्ते जातील आणि इस्लामला अभिप्रेत खरी समता येईल अशा
पद्धतीने हे रूपक असावं. कविता इस्लामचा उदोउदो करणारी नसून इस्लामला रूपकात्मक
वापरणारी आहे असं वाटण्याचं कारण म्हणजे ‘ जो मैं भी हूँ और तुम भी हो’ हा ठाशीव शब्दप्रयोग. कवितेचा जोर
‘बस एकच सत्य/अल्लाह’ ह्यावर नाही, तर तुला-मला सगळ्यांना समान मानणारे
राज्य येईल ह्या आत्मविश्वासावर आहे. फैजचा हेतू त्याने ज्या स्थळ-काळात कविता
लिहिली त्या वेळेच्या राजकारणाचा होता असं मानायला पूर्ण वाव आहे. धार्मिक
रूपकांचा वापर भारतीय स्वातंत्र्यलढ्यातही झाला होता, उदाहरणार्थ ‘कीचकवध’ हे नाटक.
पण त्याचवेळी फैजच्या
identity मध्ये
त्याची धार्मिक identity होती
ही गोष्टसुद्धा ह्या कवितेतून उघड दिसते. किंवा आपल्या राजकीय हेतूसाठी धार्मिक
असण्याचे सोंग करायला फैज पुढेमागे पाहत नव्हता असं आपल्याला म्हणायला लागेल. धार्मिक
आधारावर बनलेल्या देशातील लोकांना आपल्या बाजूला वळवायचे तर त्यांच्या world-view
चा भाग असलेली
धर्माची बाब आपल्याला बाजूला ठेवता येणार नाही हे राजकीय शहाणपण त्याला आले असावे,
किंवा तो धार्मिक असावा, पण धर्मांध नसावा.
फैजच्या सेक्युलर, लिबरल, डाव्या इमेजला हे निष्कर्ष तडा देणारे
असतील. पण त्यातले एक काहीतरी खरे असेल किंवा ही कविता त्याची नसेल.
फैजची मूल्यव्यवस्था
ही विसंगत होती असं आपल्याला वाटणं स्वाभाविक आहे. भारतातले हिंदू डावे विचारवंत हे
एकवेळ धर्माचे अभ्यासक असतात, पण धार्मिक नसतात. जगभरातही कम्युनिस्ट
आणि धार्मिकता ह्या दोन्ही गोष्टी सोबत बसणार नाहीत असे मानले जाते. पण कवी हे
सुसंगत असतात असे कुठेच मानले जात नाही. फैज जर प्राधान्याने कवी असेल तर तो
विसंगत असू शकतोच. सुसंगत मूल्यव्यवस्था ही विचारवंताची आवश्यकता आहे, कलाकार, राजकारणी किंवा कार्यकर्त्याची नाही.
कवी हे विचारवंत
नसतात. आणि प्रोपोगंडा कविता ह्या सुसंगत नसतात. सुसंगती हा त्यांचा उद्देशच नसतो.
लोकांना भारावून टाकणं हा त्यांचा उद्देश असतो. ‘हम देखेंगे’ हा प्रपोगंडा आहे. आणि भारावून टाकणारा आहे.
--
जामियाच्या आंदोलनात
आणि त्यानंतर देशभर होणाऱ्या CAA विरोधी निदर्शनात ‘हम देखेंगे’ गायलं गेलं आणि छिद्रान्वेषी आणि दीर्घद्वेषी अशा हिंदू वेबवीरांच्या
रडारवर ते आलं. ‘हम देखेंगे’ चा भारतातला वापर हा तसा out of
context आहे. कवितेचा संदर्भ
इस्लामशी आहे, कारण ती कविता एका इस्लामिक देशातील
आहे. कवितेत जो जिंकणार आहे तो समतावादी असल्याने मुस्लिमच असं कविता म्हणते आहे. एका
अर्थाने हे इस्लामचे radical interpretation आहे. (बस नाम रहेगा अल्लाह का/जो ग़ायब भी है हाज़िर भी, म्हणजे गैरमुस्लीम आणि मुस्लीम हे समतावादी असतील तर मुस्लिमच!). असं
म्हणायला वाव आहे कि कवितेचा आशय वैश्विक आहे , जरी रूपक मर्यादित आहे. पण मग फैजने
इतकं विवादास्पद रूपक वापरून काय साधलं नेमकं? एखाद्या भोचक
मनुष्याला हेही म्हणता येईल कि फैज जर इतका सेक्युलर होता तर तो पाकिस्तानात का
होता?
त्यापेक्षा असं
म्हणायला जास्त वाव आहे कि ‘हम देखेंगे’ ही भारतातल्या
धार्मिक भेदभावाच्या झगड्याशी जुळणारी कविता नाही. तिच्यावर वादंग होणं अपरिहार्य
आहे. आणि त्यात ही कविता इस्लामच्या संदर्भांवर आधारित आहे हे स्पष्ट आहे.
--
शशी थरूर ह्यांनी जो
मुद्दा मांडला तो खरंच tricky मुद्दा
आहे. CAA सारख्या धार्मिक भेदभाव
करणाऱ्या कायद्याचा विरोध धार्मिक चिन्हे/घोषणा वापरून करणं चूक कि बरोबर? हाच पेच
‘हम देखेंगे’ च्या वापराला लागू होतो.
धर्मावर आधारित
नसलेली भारतीय अशी identity असू
शकते आणि भारतीय ही identity हिंदू
ह्या identity चा
भाग असणं अपरिहार्य आहे ह्या दोन भूमिकांतला झगडा आपण अनुभवतो आहोत. जर आपली
भूमिका दुसऱ्या भूमिकेच्या विरोधी असेल, म्हणजेच पहिल्या प्रकारची असेल, तर धार्मिक प्रतीकांचा वापर त्या भूमिकेशी किती सोयीचा आहे हा
प्रश्न विचारायलाच हवा. अल्पसंख्यांच्या प्रतीकांचा वापर चालेल, पण बहुसंख्यांच्या
नाही असं असणार आहे का? असं असणं विसंगत नाही का? हे प्रश्न पहिली भूमिका घेऊ इच्छिणाऱ्या, पण सुसंगती राखू शकणाऱ्या माणसाने विचारायला हवेत.
--
कवीला जर आपण एखाद्या
collective identity चा
भाग आहोत आणि त्या बेहोशीत आपण काही लिहावं असं वाटत असेल तर त्याला शाहीर म्हणावं, कवी म्हणू नये. कवी असणं म्हणजे एकटं असणं, मानवाच्या अस्तित्वाच्या अर्थहीनतेकडे, अंतिमतः शोकात्म
टोकाकडे टक्क उघड्या डोळ्याने पाहणं. त्यामुळे ‘ये मेल हमारा झूठ न सच’ म्हणणारा
फैज मला भावलेला आहे. अशा फैजला ‘हम देखेंगे’ म्हणायची खात्री
कुठून आली? 😊
‘हम देखेंगे’ चं कोक स्टुडीओचं गाणं मी अनेकदा ऐकलं आहे, विशेषतः त्यात
अबिदा परवीन जो भाग गाते त्यासाठी. पण
भारताचा हिंदू इस्रायल करण्याच्या प्रोजेक्टला विरोधाचे गाणे म्हणून ते कोणी
म्हणणार असेल तर त्यांनी ते वापरू नये किंवा त्यातील इस्लामिक संदर्भांना बदलून
वापरावं. हे गाणारे बहुमतशाहीच्या जुलुमाला प्रतिरोध करायचे गाणे म्हणून गात असतील, पण हिंदू वेबवीर ह्या गाण्याला थेट गझनीच्या महंमदाशी नेऊन
जोडणार आहेत. त्यांच्या संशयी आणि खुनशी वृत्तीतून वाद निर्माण होणार आणि तेच
त्यांना हवं आहे.
नवीच गाणी लिहावीत
नाहीतर. किंवा गाणी आणि भावनांच्या भडक्यातून पलीकडे जाऊन धर्म-देश-आधुनिक लोकशाही
ह्या त्रांगड्याला नीट हात घालावा. भावनांनी भंजाळून ‘हम देखेंगे’ म्हणत आपणहून खड्ड्यात जाण्यात काहीच हशील नाही. खड्ड्यातआय.आय.टी. कानपूरवाले किंवा अजून कोणी तयारच आहेत.