सलमान खानच्या बाबतीत मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर
उमटणाऱ्या प्रतिक्रियांचा सूर आहे की त्याने निकाल विकत घेतला किंवा मॅनेज केला.
माझी प्रतिक्रिया ठरवण्याच्या आधी मी काही निरीक्षणे करणार आहे.
-
सरकारला सलमान खानबद्दल सूडबुद्धी असण्याची गरज फारशी
दिसत नाही. सलमान खान आणि त्याच्यात गुंतलेले भांडवल ह्यांचा झाला तर सरकारी
यंत्रणेला फायदाच आहे. त्यामुळे प्रचंड वेळाने का होईना सलमान खानची केस उभी रहाते
हे निरीक्षणच मुळात काय घडले असावे ह्याच्याकडे जोरदार निर्देश करते.
-
सामाजिक कामाचे दाखले, चित्रपटातून केल्या
जाणाऱ्या भूमिका आणि सोशल मीडियात घेतल्या जाणाऱ्या आणि प्रसवल्या जाणाऱ्या भूमिका
ह्या एकमेकांसोबत ठेवल्या आणि थोडा कॉन्स्पिरसीचा पवित्रा घेतला तर अत्यंत
धूर्तपणे रचली गेलेली योजना जाणवते.
-
अर्थात न्यायालयाने त्याच्यासमोर केल्या गेलेल्या
मांडणीवर आधारित निर्णय दिलेला आहे. त्यामुळे निष्कर्ष न्याय विकत घेता येतो असा
काढणं चुकीचं आहे. बुद्धी आणि सद्सद्विवेकबुद्धी ह्या एकत्र नांदतील असे नाही असा
निष्कर्ष आपण काढू शकतो. मुळात कळीची भूमिका काही अत्यंत हुशार वकिलांची आहे.
मॅनेज केल्याचा आरोप करायचा झाला तर तो सरकारी पक्षाच्या केस उभी करण्यावर करावा
लागेल. पण मुळात आर्थिक फायदा किंवा प्रसिद्धी ह्यांची तुलनेने फारशी संधी नसताना
सरकारी बाजूने असणाऱ्या वकिलांचे मला कौतुकच आहे.
-
मुळात न्यायव्यवस्थेची कसोटी ही ‘हजार अपराधी सुटले
तरी चालतील, पण एकाही निरपराध्याला शिक्षा होता कामा नये’ अशी मानली तर सलमान
खानची केस न्यायालयाचे अपयश दाखवू शकत नाही.
-
सरकारी पक्षाने ह्या निकालावर काय भूमिका घेतली
आहे आणि ते काय कृती करणार आहेत हे मला नीट कळलेलं नाही. त्यांच्या कृतीनंतर आणि
तिच्या परिणामांनंतर अनेक निष्कर्ष बदलू शकतात किंवा दृढ होऊ शकतात.
--
सलमान खानच्या ह्या केसच्या अनुषंगाने काही
गोष्टी
-
लोकभावना हा काही न्यायालयाचे निर्णय जोखायचा
निकष असू शकत नाही, जरी लोकभावना कितीही रास्त आणि पुराव्यावर आधारित असली. असं
मानलं तर आपल्याला प्रत्येक खटला जनमतचाचणी घेऊन निकालात काढावा लागेल.
-
न्यायव्यवस्थेवर जर आपण सिलेक्टिव्हली विश्वास
आणि अविश्वास दाखवत असू तर ह्याचा अर्थ लोकांची नैतिकतेची पातळीच धोक्यात आहे.
आपल्या कृतीची आपल्या मनाला होणारी जाणीव ही जर आपल्याला आपल्या योग्य-अयोग्य
ठरवण्याचा एकमात्र निकष वाटत नसेल तर आपण गंडलेले आहोत. अशा समाजात उपद्रवमूल्य आणि
गुंतवणूकमूल्य ह्याच गोष्टी महत्वाच्या ठरतील. ज्यांना ह्या गोष्टी महत्वाच्या
वाटत नसतील, आणि त्यापलीकडे न्याय्य, बरोबर असे काही असते असे वाटत असेल तर
त्यांनी हालचाल केली पहिजे.
-
ही हालचाल स्वतः काय न्याय्य आणि काय अन्याय्य हे
ठरवून स्वतःच न्यायाची अंमलबजावणी करण्याची असेल किंवा व्यवस्थेत बदल करण्याची
असेल. आणि ही हालचाल केवळ अशा एका उदाहरणापुरती असून चालणार नाही. आणि ती सदासर्वकाळ
सूडाने प्रेरित असूनही चालणार नाही.
-
सलमान खान सुटला म्हणून चुकचुणारे लोक हे
न्याय-अन्याय ह्याच्या प्रश्नाने अस्वस्थ आहेत का अन्य कशाने हेही आपल्याला
तपासावं लागेल. अनेकविध दंगली, भ्रष्टाचार, बलात्कार, दहशवाद आणि अन्य गुन्हे
ह्यात जर आपण न्यायालयाचा निर्णय सर्वतोपरी मानणार असू आणि काही काही ठिकाणी तो
आपल्याला खटकणार असेल तर मुळात ही विसंगती कशाच्या आधारावर आहे हे आपल्याला पहावं
लागेल. जर आपल्या मनात असणारे, तर्काच्या आणि पुराव्याच्या आधाराने बनलेले जजमेंट
(मिडीयाच्या नव्हे) आणि न्यायव्यवस्थेचा निकाल ह्यांच्या फरकातून विसंगती आली असेल
तर शंका रास्त आहे. पण आपली श्रद्धा, किंवा बुद्धीच्या आधाराशिवाय उभ्या समजुती, तत्कालीन
प्रभाव, वैरभावना, भावनिक जुळणी ह्यामुळे आपल्याला न्यायालयाचा निकाल पटत नसेल तर
आपल्यात गडबड आहे.
माझ्या जिवलगांच्या अंगावरून
गाडी गेली असती आणि माझ्यासमोर कोणी एक व्यक्ती अपराधी म्हणून आणली असती तर मी कशाप्रकारे
निर्णय घेतला असता आणि काय कृती केली असती ह्याचं उत्तर मला शोधावं लागेल.